– २८.६९ ग्रॅम एम.डी. पावडरसह तिघांना पकडले; ३.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत एम.डी. पावडर विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २८.६९ ग्रॅम एम.डी पावडर, तीन मोबाईल आणि होंडा ऍक्टिव्हा मोपेड असा एकूण ३ लाख ९८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.३० ते पहाटे २.३० वाजेदरम्यान यशोधरानगर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडेवस्तीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर काळ्या रंगाच्या ऍक्टिव्हा मोपेडवर तीन इसम असून त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी निलगिरी अपार्टमेंटसमोर, ऑटोमोटिव्ह मेट्रो स्टेशनजवळ सापळा रचला. वर्णनाशी मिळतेजुळते तीन जण एका दुचाकीजवळ आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांची नावे रितीक हेमंत उपवंशी (२४), पियुष उमेश वाघ (१८) आणि देवांग विजय सोनारे (१८) अशी निष्पन्न झाली. तिघेही रा. पांडेवस्ती, यशोधरानगर, नागपूर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांकडील झडतीमध्ये २८.६९ ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आली. तसेच तीन मोबाईल आणि होंडा अॅक्टिव्हा मोपेड क्रमांक एमएच ४९ सीटी ४३५७ जप्त करण्यात आली.
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) व २९ अन्वये यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत वपोनि. युनूसचांद शेख, पोउपनि. अनंत पाटील, पोहवा. राहुल बोन्द्रे, पो.अ. संदीप वानखेडे, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, भूषण येरोजवार, मनोज गवई व संदीप सबळे यांनी सहभाग घेतला.
Author: संतोष तायडे
संपादक















