– आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या नावाने बँक खाती उघडून गैरव्यवहाराचा संशय
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात कार्यरत असल्याचा संशय असलेल्या सायबर फसवणूक व हॅकिंग रॅकेटची सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत जावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन गोपाळराव मते यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली आहे.
आमदार मते यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या गंभीर स्वरूपाच्या माहितीकडे लक्ष वेधले आहे. नागपूर शहरातील वर्धमाननगर, खामला आणि जरीपटका परिसराशी संबंधित काही व्यक्तींचा कथित सायबर फसवणूक रॅकेटशी संबंध असल्याची माहिती नागरिकांनी दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित किंवा अनभिज्ञ नागरिकांची कागदपत्रे विविध कारणांनी ताब्यात घेऊन त्यांच्या नावाने बँक खाती उघडली जात असल्याचा संशय आहे. या खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार, ऑनलाइन फसवणूक, गॅम्बलिंग अथवा गेमिंग ॲपशी संबंधित व्यवहार तसेच हवाला आणि मनी लाँडरिंगसारख्या बेकायदेशीर कारवायांसाठी होत असल्याची शक्यता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
एमडी असो की सायबर फ्रॉड; ‘फ्रंटलाइन’ आरोपींपलीकडे तपास कधी?
सायबर फसवणूक असो किंवा एमडीसारख्या अमली पदार्थांची प्रकरणे, पोलिसांकडून कारवाई करताना ठळकपणे समोर येणाऱ्या किंवा प्रत्यक्ष व्यवहारात पकडल्या गेलेल्या आरोपींना अटक केली जाते; मात्र या कारवायांच्या मागे असलेले मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी, पुरवठादार, नेटवर्क आणि संपूर्ण साखळीपर्यंत तपास पोहोचतो का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
अनेक प्रकरणांमध्ये केवळ समोर आलेल्या आरोपींवर कारवाई करून तपासाची इतिश्री केली जाते आणि गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पुरेसा प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः ९९ टक्के प्रकरणांमध्ये तपास केवळ वरवरचाच राहतो, असा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी नेटवर्कचे मूळ सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार नियंत्रित करणारे घटक कायद्याच्या कचाट्यातून निसटत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
मात्र, हा आरोप अधिकृत तपासातून सिद्ध होणे आवश्यक असून, प्रत्येक प्रकरणात तपासाची व्याप्ती आणि पोलिसांनी केलेली कारवाई स्वतंत्रपणे तपासणे गरजेचे आहे.
प्रतापनगर पोलिसांच्या कारवाईनंतर संशय अधिक गडद
आमदारांच्या पत्रात प्रतापनगर पोलिस ठाण्याने अलीकडे अटक केलेल्या संतोष चेतावणी आणि विकी वाघमारे या संशयितांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे दोघे कथित रॅकेटशी संबंधित आहेत का, तसेच दिल्ली, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांशी त्यांचे संबंध आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बँक खाती, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची ‘कुंडली’ तपासा
या प्रकरणाची केवळ स्थानिक पातळीवर चौकशी न करता आवश्यक असल्यास सायबर पोलिस, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), गुन्हे शाखा तसेच संबंधित केंद्रीय व राज्य यंत्रणांच्या समन्वयातून तपास करावा, अशी मागणी आमदार मते यांनी केली आहे.
कथित रॅकेटचे सूत्रधार कोण आहेत, नागरिकांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमधून किती आणि कोणत्या प्रकारचे व्यवहार झाले, पैशांचा अंतिम लाभार्थी कोण आहे, डिजिटल पुरावे कुठे आहेत आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.
‘वरवरची कारवाई नको, मुळापर्यंत जा’
सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये केवळ प्रत्यक्ष पकडल्या गेलेल्या आरोपींपर्यंत तपास मर्यादित न ठेवता गुन्ह्याची संपूर्ण साखळी उघड करण्याची गरज आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, डिजिटल उपकरणे, बँक खाती, सोशल मीडिया संपर्क आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे नेटवर्कचा छडा लावण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, आमदार मते यांच्या पत्रातील आरोप व संशयांची अधिकृत तपासातून पडताळणी होणे आवश्यक आहे. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तींना दोषी ठरविता येणार नाही. मात्र, या पत्रामुळे नागपुरातील कथित सायबर फसवणूक रॅकेटसोबतच ‘फ्रंटलाइन आरोपींपलीकडे तपास नेऊन गुन्हेगारी नेटवर्कच्या मुळापर्यंत पोलिस पोहोचणार का?’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















