उपराजधानीतील ‘स्वाती बंगला’ जमीन घोटाळ्याचा दस्तऐवजी स्फोट!

– ‘पत्रकार क्लब’ कंपनी अस्तित्वात येण्याआधीच शासकीय बंगला मिळवला? ‘स्वाती बंगला’ प्रकरणात कागदपत्रांनी उडवली खळबळ

– 14 डिसेंबरला ट्रस्टचे पत्र; 17 डिसेंबरला कथित Leave & License Agreement; कंपनीचे Incorporation मात्र 18 जानेवारी 2017 रोजी

The Exposer
नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील मौल्यवान शासकीय ‘स्वाती बंगला’ व त्यास संलग्न 3744.40 चौ.मी. जागेच्या व्यवहारात आता एकापाठोपाठ एक नवे दस्तऐवजी प्रश्न समोर येत आहेत. असे असतांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी शुक्रवारी रवीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘स्वाती बंगला‘ हा जमीन घोटाळा असल्याच आरोप केला आहॆ. त्यामुळे नागपुरातील वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड खळबल उडाली आहॆ.

 

यासंदर्भात जनार्दन मून यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त कागदपत्राच्या पुराव्यावरून शुक्रवारी थेट सीताबर्डी पोलिस ठाण्यात 9, जणांनविरुद्ध पोलिस तक्रार केली आहॆ. चौकशी अंती दोषी आढळल्यास सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहॆ. मून यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, स्वाती बंगला मिळविण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीला टिळक पत्रकार भवन व्यवस्थापन मंडळ (ट्रस्ट) सक्रिय असल्याचे दिसून येते; तर दुसरीकडे त्यानंतरच्या व्यवहारात ‘पत्रकार क्लब ऑफ नागपूर’ या नावाचा उल्लेख करण्यात आला असून ही संपूर्ण गैर कायदेशीर प्रक्रियाच शासकीय स्वाती बंगला-जमीन हडपण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला.

या तक्रारीनुसार, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवजी मुद्दा म्हणजे 14 डिसेंबर 2016, 17 डिसेंबर 2016 आणि 18 जानेवारी 2017 या तीन तारखा. उपलब्ध कागदपत्रांनुसार, 14 डिसेंबर 2016 रोजी टिळक पत्रकार भवन व्यवस्थापन मंडळ (ट्रस्ट) यांच्या लेटरहेडवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र देण्यात आले होते. या पत्रावर प्रदीप कुमार मैत्र, अध्यक्ष, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर यांची स्वाक्षरी आहे. पत्रात Civil Lines येथील Swati Bungalow प्रेस जिमखान्यासाठी देण्याची मागणी करण्यात आल्याचे दिसते.

पत्रात अपेक्षित नावाऐवजी ‘PATRАKAR CLUB OF NAGPUR’ नाव देण्यात आल्याचा उल्लेख करून नावात दुरुस्ती करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. स्वाती बंगला लवकरात लवकर देऊन ताबा मिळावा, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. मात्र, यानंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजे 17 डिसेंबर 2016 रोजी ‘पत्रकार क्लब ऑफ नागपूर’च्या नावाने स्वाती बंगला व शासकीय जागेबाबत Leave & License Agreement झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आणि येथेच प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहॆ.

उपलब्ध Certificate of Incorporation नुसार ‘PATRАKAR CLUB OF NAGPUR’ ही कंपनी 18 जानेवारी 2017 रोजी Companies Act, 2013 अंतर्गत incorporated झाल्याचे प्रमाणपत्रात नमूद आहे. प्रमाणपत्रावर कंपनीचा CIN U74999MH2017NPL289740 असा आहे. म्हणजेच, तक्रारीतील कथित कराराची तारीख 17 डिसेंबर 2016, तर कंपनीच्या Incorporationची तारीख 18 जानेवारी 2017अशी आहॆ. यामध्ये तब्बल 32 दिवसांचे अंतर आहे.

त्यामुळे तपास यंत्रणेसमोर आता थेट प्रश्न उभा झाला आहॆ की, 17 डिसेंबर 2016 रोजी ‘पत्रकार क्लब ऑफ नागपूर’ ही कंपनी अस्तित्वात होती का? जर कंपनी 18 जानेवारी 2017 रोजीच incorporated झाली असेल, तर 17 डिसेंबर 2016 रोजी तिच्या नावाने कथित करार कोणत्या कायदेशीर स्वरूपात करण्यात आला? त्या वेळी संबंधित व्यक्तीला कोणाच्या वतीने करार करण्याचा अधिकार होता? ठरव घेतला असल्यास त्याची प्रत रेकॉर्डला आहॆ काय? तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे हा व्यवहार केला? असा सवाल मून यांनी उपस्थित केला. त्यामुळे याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांना प्राप्त पुरावे लक्षात घेता सखोल तपास करावा लागणार असून त्यांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलें आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More