पोलीसांना ‘टीप’ दिल्याचा संशय; गुंडाचा रक्तरंजित अंत!

– डोळ्यात मिरची पावडर, त्यानंतर धारदार शस्त्राने सपासप वार; नंदनवनातील शास्त्रीनगर हादरले, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

The Exposer
नागपूर : पोलिसांना माहिती देऊन आपल्या भावाला कारागृहात पाठविल्याचा संशय मनात धरून चौघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नंदनवन परिसरातील शास्त्रीनगरात घडली. आधी डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याला असहाय्य करण्यात आले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वारांची सरबत्ती करण्यात आली. गंभीर जखमी अक्षय बंडू वंजारी (३०), रा. जुना बगडगाव, याचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अक्षय याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आरोपी सूरज लोंढेकर याचा भाऊ आकाश याला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठविण्यामागे अक्षयने पोलिसांना माहिती दिल्याचा संशय आरोपींच्या मनात होता. याच संशयातून अक्षयला लक्ष्य करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिरची पावडरने डोळे झाकले; मग सुरू झाला हल्ला

बुधवारी सूरज लोंढेकर, त्याची आई वंदना लोंढेकर, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालांडुरकर हे शास्त्रीनगरातील सूरजच्या घराजवळ आले. त्यावेळी अक्षय काही मित्रांसोबत तेथे होता. वंदना हिने अक्षयच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अक्षयला काही समजण्यापूर्वीच इतर आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला.

अक्षयच्या मित्रांनी हल्लेखोरांना रोखण्याचा आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांची पर्वा न करता हल्ला सुरूच ठेवला. वारांमुळे अक्षय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

एम्समध्ये उपचार; मात्र मृत्यूशी झुंज अपयशी

गंभीर अवस्थेतील अक्षयला त्याच्या मित्रांनी तातडीने एम्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री सुमारे ८ वाजता डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले.

हत्येचा प्रयत्न ते थेट हत्या

घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी सूरज लोंढेकर, वंदना लोंढेकर, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालांडुरकर या चौघांना अटक केली आहे.

दोन वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरपले

अक्षय विवाहित असून त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. एका संशयातून सुरू झालेल्या वादाने अखेर एका कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या रक्तरंजित हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि हत्येचा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More