आईच्या जीवावर उठला; आत्मरक्षणासाठी लहान भावाने संपविले ?

– दारूच्या पैशांसाठी घरात धिंगाणा, आईला शिवीगाळ अन् मारहाणीची धमकी; कळमणा परिसरातील हत्येचा थरारक घटना

The Exposer
नागपूर : दारूच्या पैशांसाठी आई-वडिलांना शिवीगाळ करत घरात धिंगाणा घालणाऱ्या आणि लहान भावाला चाकूने मारण्याची धमकी देणाऱ्या मोठ्या भावाचा अखेर त्याच्याच लहान भावासोबत झालेल्या झटापटीत चाकूच्या वाराने मृत्यू झाला. आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या परिस्थितीत आत्मरक्षणासाठी हा वार झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या थरारक घटनेने कळमणा परिसरात खळबळ उडाली आहे.

मोहन चिंतामन बांते (21) रा. प्लॉट नंबर 223, पाच झोपडा, मिनी माता नगर, गल्ली नंबर 16, पोलिस स्टेशन कळमना, असे हत्या झालेल्या युवकांचे नाव आहॆ. समीर चिंतामन बांते (19), असे आरोपीचे नाव असून तो मृतकाचा लहान भाऊ आहॆ. कुमारीबाई चिंतामन बांते (50) असे फिर्यादीचे नाव आहॆ. कुमारीबाई या मृतक व आरोपीच्या आहॆ. प्राप्त माहितीनुसार, मिनीमाता नगरातील पाच झोपडा परिसरात हा हत्येचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील मोठा मुलगा मोहन हा दारू पिऊन घरी आल्यानंतर नेहमीच वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तो आई-वडिलांना शिवीगाळ करीत तसेच मारण्यासाठी अंगावर धावून येत असल्याचा आरोप आहे.

२६ ऑगस्टच्या सायंकाळी दारूच्या नशेत घरी आल्यानंतर मोहनने पुन्हा गोंधळ घातला. दारू पिण्यासाठी त्याने आईकडे पैशांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील अन्नधान्य व सामानाची नासधूस केली. एवढ्यावरच न थांबता त्याने लहान भाऊ समीर याला चाकूने मारण्याची धमकी दिली.

यानंतर रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दोन्ही भावांमध्ये वाद वाढला. याचवेळी समीरने चाकूने मोहनवर वार केला. गंभीर जखमी मोहनला नातेवाइकांनी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच २७ ऑगस्ट रोजी पहाटे १.१५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर कळमणा पोलिसांनी समीरला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहनच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात कलम १०३(२) वाढ करण्यात आली आहे.

आईला शिवीगाळ, घरात नासधूस, मारहाणीच्या धमक्या आणि अखेर रक्तरंजित संघर्ष—या संपूर्ण घटनाक्रमामागे नेमके आत्मरक्षण होते की खुनाचा प्रकार, याचा तपास आता कळमणा पोलिसांकडून सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More