– बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा; अड्डाचालकाला अटक, १.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी संगम नगर परिसरातील कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तीन पीडित तरुणींची सुटका केली. येथे तरुणींना दिल्ली, नागपूरसह अन्य ठिकाणांहून पैशांचे आमिष दाखवून आणण्यात येत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत देहव्यापारासाठी घर उपलब्ध करून देत असल्याच्या आरोपावरून प्रविण शालीकराम बिलसे (यादव), वय ३०, रा. पवननगर, यशोधरानगर, नागपूर याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत १ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.२५ ते ७.३५ वाजेदरम्यान संगम नगरातील संजीवनी क्वार्टर क्रमांक ३४/१, वनदेवी चौक, हॉटेल अल रहमानसमोरील गल्लीत ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. खात्री झाल्यानंतर पंच व पोलिस पथकाने घरावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी स्वतःच्या घरात तीन तरुणींकडून देहव्यापार करून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिन्ही पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
कारवाईदरम्यान पंटरने दिलेले २ हजार रुपये, आरोपीच्या ताब्यातील ६ हजार ७५० रुपये रोख, कॉन्डमचे पाकीट, MH-49-CJ-6082 क्रमांकाची सुझुकी बर्गमन स्ट्रीट मोपेड, विवो कंपनीचा मोबाइल आणि जिओ कंपनीचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात विविध कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी-कर्मचारी
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ नन्नावरे, पोलीस हवालदार गणेश गुप्ता, राजेश वासनिक, रवि अहीर, पोलीस अंमलदार लक्ष्मण पडवाल, रितेश दुधे, मंगेश गिरी, गजानन गेडाम, महिला पोलीस अंमलदार वर्षा नोनारे, बबीता नन्नावरे आणि चापोअं योगेश यांनी सहभाग घेतला.
Author: संतोष तायडे
संपादक















