SC/ST समाजाच्या हक्काच्या निधीच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

The Exposer
नागपूर : अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राखीव असलेला SCSP व TSP निधी इतर विभागांकडे वळविणे तात्काळ बंद करावे तसेच महाराष्ट्रात कर्नाटकाच्या धर्तीवर SCSP व TSP निधी संरक्षण कायदा लागू करावा, या प्रमुख मागण्यांसंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहराच्या वतीने आज मोमीनपुरा, नागपूर येथील पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीमध्ये SC/ST समाजाच्या हक्काच्या निधीच्या नियोजन, वाटप, वापर व संरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, मंजूर निधी इतर विभागांकडे वळवू नये, अखर्चित निधी पुढील वर्षासाठी सुरक्षित ठेवावा तसेच निधीच्या गैरवापरास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करावी, या मागण्यांवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.

तसेच निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी ऑनलाइन देखरेख व्यवस्था आणि SC/ST समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र देखरेख यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

बैठकीत या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन SC/ST समाजाच्या हक्काच्या  निधीच्या संरक्षणासाठी संघटितपणे जनजागृती व पुढील लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More