– हत्या, खंडणी, अपहरण, दरोड्यापासून ड्रग्स तस्करीपर्यंत १९ गंभीर गुन्हे; टोळीचा म्होरक्या अद्याप फरार
The Exposer
नागपूर : शहरातील संघटित गुन्हेगारी आणि मादक पदार्थांच्या तस्करीवर मोठा प्रहार करत अजनी पोलिसांनी कुख्यात गँगस्टर सुमित रमेश चिंतलवार (३२) आणि त्याच्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. टोळीतील सदस्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, अवैध शस्त्र, अपहरण, दरोडा, बेकायदेशीर जमाव आणि मादक पदार्थांशी संबंधित एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे, एमडी (मेफेड्रोन) विक्री व तस्करीत सहभागी असलेल्या आरोपीच्या टोळीवर नागपुरात संभवतः प्रथमच मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे एमडी तस्करीच्या नेटवर्कवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
टेरेसवर २९० ग्रॅम एमडी; १४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
२५ मे २०२६ रोजी अजनी पोलिसांनी सावित्रीबाई फुले नगर येथील आदित्य तेलगोटे यांच्या घरावर छापा टाकून टेरेसवरून २९०.५९ ग्रॅम एमडी पावडर आणि दोन मोबाईल जप्त केले होते. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १४.९० लाख रुपये होती.
या प्रकरणात आदित्य तेलगोटे, करण गटलेवार आणि नरेश उर्फ कंगारू टेकाम यांना अटक करण्यात आली असून ते सध्या नागपूर कारागृहात आहेत.
चिंतलवार फरार; पोलिसांचा शोध सुरू
या टोळीचा मुख्य सूत्रधार सुमित चिंतलवार, रा. विश्वकर्मा नगर, अजनी, हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, अवैध शस्त्र आणि मादक पदार्थांशी संबंधित १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तीन प्रकरणांत मकोकाअंतर्गत कारवाई झाल्याची माहिती आहे.
टोळीतील सदस्यांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही कथित गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने अजनी पोलिसांनी मकोकाचा प्रस्ताव पाठविला होता. मंजुरीनंतर प्रकरणात मकोकाच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे करीत आहेत.
ड्रग्स माफियांना थेट इशारा! एमडी तस्करीच्या टोळ्यांवर आता मकोकाची टांगती तलवार
या कारवाईमुळे नागपुरातील एमडी तस्करी आणि संघटित गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या इतर टोळ्यांमध्येही खळबळ उडण्याची शक्यता असून, ड्रग्सच्या खरेदी-विक्रीच्या साखळीवर मोठा आळा बसू शकतो.
Author: संतोष तायडे
संपादक















