अल्पवयीनांच्या हातात वाहनाची चावी देताय? आता पालकांनाही दंडाचा फटका!

– नागपूर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; २६ प्रकरणांत दोषसिद्धी, प्रत्येकी ₹३० हजार दंड अन् १२ महिन्यांची परवान्यावर कारवाई

The Exposer
नागपूर : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देऊन त्यांच्या जीवाबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणाऱ्या पालक आणि वाहनमालकांना आता कायद्याचा दणका बसणार आहे. नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, सन २०२६ मध्ये दाखल केलेल्या प्रकरणांपैकी २६ प्रकरणांत न्यायालयाने संबंधित आरोपींना दोषी ठरविले आहे.

दोषसिद्ध झालेल्या प्रत्येक प्रकरणात ₹३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, संबंधित वाहनचालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावर १२ महिन्यांसाठी कारवाई करण्यात आली आहे.

चावी पालक देतात, कारवाईही पालकांवर!

अल्पवयीन मुलांकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसतानाही अनेकदा पालकांकडूनच त्यांच्या हाती वाहनाची चावी दिली जाते. काही वेळा अल्पवयीन मुले दुचाकी किंवा अन्य वाहने सर्रास रस्त्यावर चालविताना दिसतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता केवळ अल्पवयीन वाहनचालकांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता पालक व वाहनमालकांच्या जबाबदारीवरही कायद्याचा बडगा उगारला आहे.

२६ दोषसिद्धी; प्रत्येकी ३० हजारांचा दंड

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणांमध्ये Motor Vehicles Act मधील कलम 199A अन्वये ₹२५ हजार दंड, तसेच कलम 199(4) अन्वये १२ महिन्यांसाठी वाहन चालविण्याच्या परवान्यावर रद्द/अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी प्रत्येक दोषसिद्ध प्रकरणात एकूण ₹३० हजारांचा दंड करण्यात आला आहे.

‘मुलाला काय होणार?’ या मानसिकतेला लगाम

अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देणे ही केवळ वाहतूक नियमांची मोडतोड नसून, गंभीर अपघाताला आमंत्रण ठरू शकते. वाहनावरील नियंत्रण, वाहतुकीचे भान आणि संकटाच्या प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता याबाबत अल्पवयीन मुलांकडे आवश्यक परिपक्वता नसू शकते. त्यामुळे पालकांनी ‘थोडे अंतर आहे’, ‘मुलाला वाहन चालविता येते’ किंवा ‘काही होणार नाही’ या मानसिकतेतून पाल्याच्या हातात वाहन देणे टाळावे.

अपघात घडण्यापूर्वीच सावध व्हा!

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देण्याचे गंभीर परिणाम केवळ दंडापुरते मर्यादित राहू शकत नाहीत. अपघात झाल्यास संबंधित अल्पवयीनासह इतर नागरिकांचेही जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे पालक आणि वाहनमालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास न देण्याचे आवाहन नागपूर शहर वाहतूक विभागाने केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More