– विद्यार्थी-पालकांसह महाविद्यालयांनाही अखेरची संधी; मुदतीनंतर जुने पोर्टल कायमचे बंद — अर्ज प्रलंबित राहिल्यास महाविद्याल्याचीच जबाबदारी
The Exposer
नागपूर : महाडीबीटी १.० पोर्टलवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी आता प्रशासनाने १५ सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी, पालक तसेच संबंधित महाविद्यालयांना प्रलंबित अर्जांची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ही अखेरची संधी देण्यात आली आहे.
महाडीबीटी १.० पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नागपूर प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.
महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्तरावर काही त्रुटी असल्यास त्या तातडीने दुरुस्त करून अर्ज पुन्हा प्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थी स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी अर्जातील त्रुटी, आवश्यक कागदपत्रे अथवा इतर पूर्तता तातडीने पूर्ण करून अर्ज विहित मुदतीत सादर करावा. १५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची कार्यवाही पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी व पालकांची राहणार आहे. मुदतीनंतर अर्ज सादर न झाल्यास त्यासाठी संबंधित विभाग जबाबदार राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१५ सप्टेंबरनंतर ‘जुने’ पोर्टल बंद!
१५ सप्टेंबर २०२६ ही महाडीबीटी १.० वरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची अंतिम संधी आहे. या मुदतीनंतर महाडीबीटी १.० पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याने प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अंतिम मुदत ठरणार आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या पोर्टलवरील प्रलंबित अर्ज आणि नव्या शैक्षणिक वर्षातील अर्ज यामध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी आपली माहिती आणि रेकॉर्ड नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार-रविवारीही महाविद्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश
प्रलंबित अर्जांचा वाढता अनुशेष लक्षात घेता विभागातील सर्व महाविद्यालयांनी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही महाविद्यालये सुरू ठेवून प्रलंबित अर्जांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयांनी आपल्याकडील प्रलंबित अर्जांची प्रक्रिया पूर्ण करून ते विहित मुदतीत संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत.
त्यामुळे महाडीबीटी १.०वरील प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘नंतर करू’ची भूमिका न घेता तातडीने अर्जाची स्थिती तपासून त्रुटींची पूर्तता करावी, अन्यथा अंतिम मुदत उलटल्यानंतर शिष्यवृत्ती अथवा संबंधित लाभाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दिलेली ही अखेरची संधी विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी गांभीर्याने घेऊन १५ सप्टेंबरपूर्वी सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















