– १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल; गणेशभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
The Exposer
नागपूर : सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि गणेशभक्तीची परंपरा जोपासणाऱ्या नवशक्ती गणेश उत्सव मंडळ, सद्गुरुवाडी, जुना बाबुळखेडा, छत्रपती शिवाजी चौक, नागपूर यंदा आपल्या गणेशोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. स्थापना १९७७ मध्ये झालेल्या या मंडळाचा यंदाचा ५० वा गणेशोत्सव असून, त्यानिमित्ताने १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने आगमन सोहळा, श्रींच्या मूर्तीची स्थापना, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, महाआरती, ढोल-ताशा पथक, बक्षीस वितरण, भव्य महाप्रसाद तसेच विसर्जन सोहळ्याचे नियोजन केले आहे.
१४ सप्टेंबरला श्रींच्या मूर्तीची स्थापना
गणेशोत्सवाची सुरुवात सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीच्या स्थापनेने होणार आहे. त्यानंतर मंगळवारी व बुधवारी दुपारी २ वाजता भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ व १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, तर १९ व २० सप्टेंबर रोजी नृत्य कार्यक्रम रंगणार आहेत.
त्यानंतर २१ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, तर २२ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. २३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता महाआरती व ढोल-ताशा पथकाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ सप्टेंबरला बक्षीस वितरण, २५ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता भव्य महाप्रसाद, तर २६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता श्रींच्या मूर्तीचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, राधीकाताई पांडव कॉलेजचे अध्यक्ष गिरीश पांडव, माजी नगरसेवक रमेश शिंगारे, सामाजिक कार्यकर्ते नागोराव जयकर, नगरसेविका भारतीताई बुंदे, नगरसेविका शिलाताई तराळे, नगरसेवक मनोज गावडे, नगरसेवक अंकित चौधरी, माजी नगरसेविका विशाखा बांते यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ आणि सद्गुरू भक्ती मंदिराचा पुढाकार
मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवाच्या आयोजनात सर्व ज्येष्ठ नागरिक गण, महिला मंडळ आणि सद्गुरू भक्ती मंदिर (मठ) यांचा सहभाग असून, गणेशभक्तीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. ५० वर्षांची परंपरा, भक्तीचा उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकारी व आयोजकांनी केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















