गौराई विसर्जन; दोन बाल कबड्डीपटूंचा बुडून मृत्यू

– काटोलच्या झिल्पा परिसरातील हृदयद्रावक घटना; १३ वर्षीय आयुष कुमरे आणि दर्शन लाड यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

The Exposer
नागपूर : गौराई विसर्जनाचा आनंद सुरू असतानाच काळाने दोन कुटुंबांवर घाला घातला. काटोल तालुक्यातील झिल्पा परिसरात गौराई विसर्जनासाठी गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी सुमारे ११ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. आयुष हरीश कुमरे आणि दर्शन धनराज लाड, दोघेही झिल्पा येथील रहिवासी, अशी मृत मुलांची नावे आहेत.

आयुष आठवीत, तर दर्शन सातवीच्या वर्गात शिकत होता. विशेष म्हणजे दोघेही जय भवानी क्रीडा मंडळाचे कबड्डीपटू होते. मैदानावर आपल्या कौशल्याची छाप पाडत भविष्यात मोठे यश मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या दोन होतकरू खेळाडूंचा जीवनप्रवास अचानक थांबला. त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण झिल्पा गावावर शोककळा पसरली आहे.

गौराई विसर्जन सुरू असतानाच काळाचा घाला

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिल्पा गावातील महिला मंगळवारी गौराई विसर्जनासाठी गावालगतच्या शिवारातील तलावावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काही मुलेही पाण्यात उतरली होती. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असतानाच आयुष आणि दर्शन अचानक खोल पाण्यात बुडाले.

दोन्ही मुले दिसत नसल्याचे लक्षात येताच महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच दोन्ही मुलांचे नातेवाईकही तलावाकडे धावले. आयुषचे काका आणि दर्शनचे काका यांनी तत्काळ पाण्यात उतरून दोघांचा शोध सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

दोन कुटुंबांचा आधार हरपला; क्रीडा क्षेत्रातही हळहळ

आयुष आणि दर्शन हे कबड्डीचे खेळाडू असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मित्र, सहकारी खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. लहान वयातच खेळाची आवड जोपासत मैदानावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या या दोन होतकरू खेळाडूंचा असा दुर्दैवी अंत झाल्याने झिल्पा परिसर सुन्न झाला आहे. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More