मोबाईल हरवला अन् बँक खाते झाले साफ!

– हरवलेल्या सॅमसंग S-25चा गैरवापर; इंटरनेट बँकिंग, ATM-पॉस मशीनद्वारे ८.५० लाखांवर डल्ला

The Exposer
नागपूर : मोबाईल हरवणे एका वाहतूक व्यावसायिकाला तब्बल ८ लाख ४९ हजार ९९९ रुपयांना महागात पडले. हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करून अज्ञात सायबर आरोपीने इंटरनेट बँकिंगचा अनधिकृत वापर केला. त्यानंतर बँक खात्यातील रक्कम दुसरीकडे वळविण्यासह विविध ATM आणि POS मशीनद्वारे पैसे काढून घेत व्यावसायिकाचे खाते अक्षरशः रिकामे केले. हा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर परिसरात उघडकीस आला.

आशिक सहारे (४१), रा. बेलदारनगर, हुडकेश्वर, असे तक्रारदाराचे नाव आहे. सहारे यांचा सॅमसंग गॅलेक्सी S-25 मोबाईल १० सप्टेंबरच्या सुमारास हरवला होता. मोबाईल हरवल्यानंतर काही कालावधीतच त्यांच्या बँक खात्यात अनधिकृत व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करून त्यातील इंटरनेट बँकिंग सुविधेचा अनधिकृतपणे वापर केला. आरोपीने सहारे यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातील रक्कम दुसरीकडे वळविली. एवढ्यावरच न थांबता विविध ATM आणि POS मशीनच्या माध्यमातूनही रक्कम काढून घेतली.

खात्यातील संशयास्पद व्यवहार लक्षात येताच सहारे यांनी तातडीने हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून त्याला अटक करण्यात आलेली नाही. बँक खात्यातील व्यवहार, पैशांच्या हालचाली आणि संबंधित व्यवहारांची माहिती तपासून आरोपीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

मोबाईल हरवल्यानंतर मोठा धोका

या घटनेमुळे मोबाईल हरवल्यानंतर त्यामध्ये बँकिंग अ‍ॅप, ई-मेल, OTP किंवा इतर संवेदनशील माहिती उपलब्ध असल्यास त्याचा गैरवापर होण्याचा धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More