१०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आता ५०० खाटांचे होणार!

– २०० खाटांचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; हृदय, मेंदू, मूत्रपिंड, कर्करोगासह ट्रॉमा उपचारांची सुविधा

The Exposer
नागपूर : जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवेला मोठी चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला असून, सध्या १०० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयाचा विस्तार थेट ५०० खाटांपर्यंत करण्याचे नियोजन आहे. राज्य सरकारच्या ४ हजार २५० कोटी रुपयांच्या प्रगती प्रकल्पांतर्गत हा विस्तार प्रस्तावित असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे २०० खाटांचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव.

या रुग्णालयामुळे हृदयविकार, मेंदूविकार, मूत्रपिंडाचे गंभीर आजार, कर्करोग, बाल शस्त्रक्रिया तसेच अपघातातील गंभीर जखमी रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा शासकीय व्यवस्थेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आयुक्तांकडून प्रस्तावाचा आढावा; शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा

आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांनी नागपूर दौऱ्यात जिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित विस्ताराचा सविस्तर आढावा घेतला. ५०० खाटांच्या रुग्णालयाचा अंतिम प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, तर दुसऱ्या टप्प्यात २०० खाटांचे स्वतंत्र अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

दहा एकर जागेसाठी प्रशासकीय हालचाली

विस्तारासाठी मनोरुग्णालयाची सुमारे दहा एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून जागा हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

जागा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, खाटांसोबतच विविध विशेष उपचार विभागांची क्षमताही वाढणार आहे.

सात सुपर स्पेशालिटी विभागांचा प्रस्ताव

प्रस्तावित २०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सात प्रमुख विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्डिओलॉजी – हृदयरोग

न्यूरोलॉजी – मेंदूविकार

नेफ्रॉलॉजी – मूत्रपिंडविकार

गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी – पचनसंस्थेचे विकार

ऑन्कोलॉजी – कर्करोग

पेडियाट्रिक सर्जरी – बाल शस्त्रक्रिया

विशेष ट्रॉमा केअर – गंभीर अपघातग्रस्तांसाठी उपचार

यामुळे गंभीर आजार आणि अपघातांच्या उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांवर असलेला ताण कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

नागपूर ठरणार राज्यातील तिसरे सार्वजनिक सुपर स्पेशालिटी केंद्र

सध्या नाशिक आणि अमरावती येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची सुपर स्पेशालिटी रुग्णालये कार्यरत आहेत. नागपुरातील प्रस्तावित केंद्र प्रत्यक्षात आल्यास ते राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे तिसरे सुपर स्पेशालिटी केंद्र ठरणार आहे. यामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागावरील रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

फक्त जिल्हा रुग्णालय नव्हे; पोलिसांसाठीही स्वतंत्र सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची गरज!

जिल्हा रुग्णालयाचा विस्तार स्वागतार्ह असला तरी नागपूरसारख्या वाढत्या महानगरासाठी आता पुढचे पाऊलही तितकेच महत्त्वाचे आहे. नागपूर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी संख्या, त्यांचे २४ तासांचे कर्तव्य, अपघातांचा धोका आणि तणावपूर्ण कामाचे स्वरूप लक्षात घेता पोलिसांसाठी स्वतंत्र, सुसज्ज सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे.

पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कायदा-सुव्यवस्था राखताना स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. गंभीर अपघात, हृदयविकार, न्यूरोलॉजिकल समस्या, कर्करोग, मूत्रपिंडविकार किंवा आपत्कालीन शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाल्यास त्यांना तातडीने दर्जेदार उपचार मिळणे ही केवळ सुविधा नसून शासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे.

गृहजिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेला नवा चेहरा देण्याची संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात शासकीय आरोग्यव्यवस्थेचा विस्तार करण्याची ही मोठी संधी आहे. जिल्हा रुग्णालयाचा ५०० खाटांपर्यंत विस्तार आणि २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा निर्णय प्रत्यक्षात उतरला, तर नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गंभीर रुग्णांसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

मात्र, याच आरोग्य विस्ताराच्या आराखड्यात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची ‘निव’ शासनाने का ठेवू नये? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More