लकडगंज पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’; रोख रकमेसह ₹17,930 जप्त

– रोख रकमेसह ₹17,930 चा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात, तीन आरोपी फरार

The Exposer
नागपूर : जुनी मंगळवारी परिसरातील धीवर मोहल्ल्यात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर लकडगंज पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ₹17,930 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, गुन्ह्यातील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता लकडगंज पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना जुनी मंगळवारी, धीवर मोहल्ला येथे काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत सेवन रमेश चौधरी (वय 30, रा. हत्ती नाला, जुनी मंगळवारी) आणि गणेश हरीश धांडे (वय 20, रा. जुनी मंगळवारी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध अप. क्र. 685/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत

कारवाईदरम्यान जावेद उर्फ मुर्गा मो. शुकूर (वय 40), राजेश उर्फ भुऱ्या हरीभाऊ करणुके (वय 38) आणि खुशाल उर्फ मिट्टू वल्द हरिश्चंद्र पौनीकर (वय 31) हे तीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास व शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश उर्फ भुऱ्या आणि खुशाल उर्फ मिट्टू यांच्या क्राईम चार्टमध्ये यापूर्वीही जुगारासह इतर प्रतिबंधक कारवायांची नोंद आहे.

जुगार अड्ड्यांना थारा नाही; पोलिसांचा इशारा

लकडगंज पोलिसांनी या कारवाईतून परिसरातील अवैध जुगारविरोधात कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. अवैध जुगार किंवा पत्त्यांचे अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी स्थानिक पोलिसांशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More