– घटनांच्या कड्या कुठे जूळतात; पोलिस ठाण्यात बोलावणारे ते दोन पोलीस कर्मचारी कोण? ६५ जणांची चौकशी,
– तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित; जमीनीच्या वादापासून शेवटच्या सिसिटीव्ही व मोबाईल लोकेशनपर्यंतच्या तपासाची मागणी
The Exposer
नागपूर : गोवंशसेवेला जीवन समर्पित करणारे कामधेनू गौशाळा व चिकित्सालयाचे संचालक राजूभाई पंड्या अचानक बेपत्ता झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी तपासाचा आवाका १७ जिल्ह्यांपर्यंत वाढविला असून मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील सुमारे ७० गौशाळांमध्येही त्यांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
मात्र, राजूभाई बेपत्ता होण्यापूर्वी घडलेल्या घटनांची सांगड घातल्यास सुमारे २० एकर जमीन, गोशाळेवरील अतिक्रमण कारवाई, दोन गोवंशांचा मृत्यू, लकडगंज पोलिसांत झालेली तक्रार, गौशाळेपर्यंत आलेले दोन पोलिस कर्मचारी आणि त्यानंतर राजूभाईंचे बेपत्ता होणे या घटनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
२० एकर जमिनीचे गूढ काय?
गौशाळेशी संबंधित सुमारे २० एकर जमीन या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. या जमिनीची मालकी कोणाची? तिच्याबाबत कोणता वाद होता का? या जमिनीमुळे कोणाचे हितसंबंध प्रभावित होत होते का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
एका नगरसेवकाने राजूभाईंना कथितरीत्या ‘तुमची गोशाळा अतिक्रमणाच्या जागेवर आहे’, असे सांगितल्याची चर्चा आहे. त्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई गौशाळेपर्यंत पोहोचली. एवढ्यावरच नगरसेवक थांबले नाही तर ते पोलिसांपर्यंत पोहचले. तर मग ही अतिक्रमणाची तक्रार कोणी केली? कारवाईचे आदेश कोणी दिले? आणि या कारवाईचा २० एकर जमिनीशी काही संबंध होता का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
कारवाईच्या दिवशी दोन गौवंशांचा मृत्यू; त्यानंतर राजूभाई बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी अतिक्रमण पथकाने कारवाई केली, त्याच दिवशी दोन गौवंशांचा मृत्यू झाला. या घटनेने राजूभाई अत्यंत व्यथित झाले होते, असे सांगितले जाते. तर याच दिवशी लकडगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याच सायंकाळी राजूभाई अचानक बेपत्ता झाले. या घटना केवळ योगायोग आहेत की त्यांच्यामध्ये काही संबंध आहे? याचा निष्कर्ष सध्या काढता येत नसला तरी घटनांची संपूर्ण टाइमलाइन तपासणे महत्त्वाचे ठरते.
ठाण्यात बोलावणारे ते दोन पोलीस कर्मचारी कोण?
राजूभाई बेपत्ता होण्यापूर्वी दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवरून त्यांच्याकडे आले आणि त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी एकाने हेल्मेटही काढले नव्हते, असे सांगितले जाते. ते दोघे पोलिस कर्मचारी कोण होते? त्यांना राजूभाईंना ठाण्यात बोलावण्यासाठी कोणी पाठवले? कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आले होते? त्यांच्याविरुद्ध कोणती तक्रार किंवा कारवाई प्रस्तावित होती का? या भेटीची नोंद स्टेशन डायरीसह तपासात घेण्यात आली आहे का? या प्रश्नांची उत्तरे राजूभाईंच्या बेपत्ता होण्यापूर्वीची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात.
६५ जणांची चौकशी; तरीही ठावठिकाणा नाही
राजूभाई बेपत्ता झाल्यानंतर लकडगंज पोलीस ठाणे आणि संबंधित चौकी परिसरातील सुमारे ६५ जणांचे जबाब घेण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये परिसराशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, एक राजकीय नेता राजूभाईंना भेटण्यासाठी आला होता, अशी चर्चा आहे. तो संबंधित प्रभागातील नसल्याचे सांगितले जाते. त्याची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याचीही चौकशी झाली का, हा प्रश्न उपस्थित आहे.
राजूभाईंना स्वतःची गोशाळा सोडण्याची वेळ का आली?
राजूभाईंनी कामधेनू गौशाळेची नोंदणी केली होती. आपल्या दुकानातील एका खोलीत त्यांनी गौशाळेचे कार्यालय उभारले होते. गौवंशसेवेसाठी त्यांनी कौटुंबिक कार्यक्रमांपासूनही अनेकदा दूर राहणे पसंत केले होते. एवढेच नव्हे तर ते चारही पायाने अपंग असलेल्या व अपघातात जखमी झाल्याने मानेचा भाग वाकलेल्या गाईला ज्या कार्यालयात ठेवायचे, तेथेच रात्रीला एका खाटेवर झोपायचे. यावरुन स्वतःचे घर दार सोडून जो व्यक्ती जखमी, अपंग अशा मुक्या जनावरांसोबत राहत असेल तर अशा परिस्थितीत त्यांना स्वतःची गौशाळा सोडण्याची वेळ का आली? खरच ते गौशाळा सोडून जाऊ शकतात का? की हा घातपाताचा प्रकार आहे, असे विविध प्रश्न निर्माण होऊन परिसरात उलट सुलट चर्चा रंगली आहे.
या प्रकरणात जमिनीचा वाद, अतिक्रमणाचा प्रश्न, कोणाचा दबाव किंवा अन्य काही कारण? याचे उत्तर पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांचे सिडिआर काढले असून व्हाट्सऍप कॉल, मॅसेज व टेक्स्ट मॅसेज सुद्धा चाळत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी नागपुरातील सुभाष शाहू सायनाईड किलिंग प्रकरणी पोलिसांनी अथक तपासातून मोबाईलवरील ‘टेक्स्ट मॅसेज’वरून त्यांच्याच संशयित निकटवर्तीच्या मुसक्या आवळल्या होत्या, हे विशेष.
त्यामुळे या प्रकरणात कुठलाही निष्कर्ष काढण्याऐवजी जमिनीची कागदपत्रे, अतिक्रमण कारवाई, पोलिसांची हालचाल, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि राजूभाईंच्या शेवटच्या संपर्कापर्यंत प्रत्येक कडीची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
आता प्रश्न केवळ ‘राजूभाई कुठे आहेत?’ एवढाच नाही!
राजूभाई बेपत्ता होण्यापूर्वी नेमके काय घडले? २० एकर जमिनीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? अतिक्रमण कारवाईमागील तक्रार नेमकी कोणी केली? ठाण्यात बोलावणारे ते दोन पोलीस कर्मचारी कोण होते? या प्रकरणात एका राजकीय नेत्याला स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात लुडबुड करण्याची गरज का पडली असावी. आणि त्यानंतर राजूभाई कुठे गेले? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच प्रकरणातील अनुत्तरित कड्या जोडल्या जाऊ शकतील. दरम्यान, राजूभाई पंड्या यांचे कुटुंबीय, गौसेवक आणि त्यांच्याशी संबंधित नागरिक त्यांच्या सुरक्षित परतण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक















