नागपुरात गांजाची तस्करी उघड! पाचपावलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; तिघांना अटक

– २ किलो गांजा, सुझुकी एक्सेस मोपेड आणि दोन मोबाईल जप्त; २ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

The Exposer
नागपूर : नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गांजाच्या प्रकरणात तीन जणांना अटक केली.

या कारवाईत २ किलो गांजा, सुझुकी एक्सेस मोपेड आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक मोहीम राबविल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज नगर टेक्यात पहाटे कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ६.१० वाजताच्या दरम्यान ताज नगर टेक्यात, इस्रार अन्सारी यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. पंचांसमक्ष झडती घेतली असता संशयितांकडून गांजा आणि अन्य मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये

सलमान अब्दुल रहमान अन्सारी (वय ३१), रा. बिलाल मशीदजवळ, यशोधरानगर चौक, संदीप ऊर्फ भुऱ्या गणेश लील्लारे (वय २३), रा. आराधना नगर, हनुमान मंदिराजवळ, बिडगाव, अतीफुर रहमान मोबीन रहमान अन्सारी (वय २९), रा. योगी अरविंद नगर, यशोधरानगर यांचा समावेश आहे.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात १ लाख रुपये किंमतीचा २ किलो गांजा, ९० हजार रुपये किंमतीची सुझुकी एक्सेस मोपेड, १० हजार रुपये किंमतीचे दोन विविध कंपन्यांचे मोबाईल, असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार शेख इमरान यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा (NDPS Act) मधील कलम ८(क), २०(ब)(ii) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More