– चार आरोपींना मोठा झटका, शहरात प्रथमच गोवंश तस्करांवर मकोकाचा फास
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि ऐतिहासिक कारवाई करत प्रथमच एका संघटित गोवंश तस्करांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. ही धडक कारवाई तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून शहरातील अवैध गोवंश तस्करीच्या साखळीवर पोलिसांनी निर्णायक घाव घातल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वकील, नवाब, चांद आणि जावेद व इतर या आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगितल्या जाते. मात्र, नावा बाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संबंधित आरोपींवर गोवंश तस्करी, अवैध वाहतूक, पशुचोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.
तहसील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी दीर्घकाळापासून संघटित गुन्हेगारी टोळीच्या स्वरूपात गोवंश तस्करीचे जाळे चालवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी मकोका प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला पोलीस परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी शिफारस केली.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्या नेतृत्वात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींवर मकोका लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनीता मोरे करीत आहेत. गोवंश तस्करीसारख्या संघटित गुन्हेगारीविरोधात नागपूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, अशा गुन्हेगारी टोळ्यांना कठोर संदेश देणारी ही कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











