पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींना मनचल्यांचा त्रास!

– भररस्त्यात अश्लील शेरेबाजी; लाल कारमधील युवकांची दादागिरी कॅमेऱ्यात?

The Exposer
नागपूर : उपराजधानी नागपुरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी पहाटे तेलंखेडी परिसरात शारीरिक सराव आणि धावण्याचा सराव करणाऱ्या युवतींशी काही कारस्वार युवकांनी कथितरित्या छेडछाड करत अश्लील टिप्पण्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंखेडी हनुमान मंदिर रोड परिसरात दररोजप्रमाणे अनेक युवती पोलिस भरतीच्या तयारीसाठी सराव करत होत्या. त्याचवेळी लाल रंगाच्या कारमधून (एमएच-31 एफआर-2558) आलेल्या काही युवकांनी युवतींवर अभद्र आणि अश्लील टिप्पण्या करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर काही युवकांनी अश्लील हावभाव केल्याचाही आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक युवती घाबरल्या व संतप्त झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी विरोध केल्यानंतर संबंधित युवकांनी घटनास्थळावरून कारसह पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते.
पोलिस दलात भरती होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवतींनाच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पहाटेच्या वेळेत सराव करणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कार क्रमांक पोलिसांकडे; आरोपींचा शोध सुरू

तक्रारीसोबत संबंधित कारचा क्रमांकही पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, वाहन नोंदणी माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अवघड नसल्याचे बोलले जात आहे. महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर संदेश देण्याची मागणी केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More