पोलिसांच्या जाळ्यात ‘गधा’! घरफोड्या-व वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

– यशोधरानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३ घरफोड्या अन् ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस
– आरोपीकडून तब्बल ₹३ लाख ४७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : यशोधरानगर परिसरात घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या सराईत आरोपीला अखेर यशोधरानगर पोलिसांनी गजाआड केले. पियुष उर्फ गधा वल्द दीपक निमजे (वय २०, रा. नाईक तलाव, बांगलादेश, माहूरकर मूर्तिकार यांच्या घराजवळ, पंचपावली, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपीचा तीन घरफोड्या आणि पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांशी संबंध उघडकीस आला आहे. आरोपीकडून विविध गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल आणि वाहने असा एकूण ₹३ लाख ४७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरफोड्यांपासून वाहनचोरीपर्यंत धुमाकूळ

यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना पियुष उर्फ गधा निमजे याच्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. तपास पथकाने त्याचा शोध घेतला असता तो पंचवटी नगर मैदान परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

चौकशीत आरोपीने यशोधरानगरमधील कुंदनलाल गुप्ता नगर, कांजी हाऊस परिसर, धर्मदीप नगर तसेच इतर भागांत घरफोड्या केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एक्स्ट्रिम मोटारसायकल, पल्सर आणि होंडा अॅक्टिव्हा यांसह विविध वाहने चोरी केल्याचे तपासात समोर आले.

हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन नेहरूनगर येथून चोरी केलेली स्प्लेंडर मोटारसायकल, पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली अॅक्टिव्हा तसेच शांतिनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीची रॉयल एनफिल्ड बुलेट पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विटाभट्टीच्या मागे लपविला चोरीचा मुद्देमाल

आरोपीने चोरी केलेल्या ठिकाणांची माहिती दिल्यानंतर तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीच्या सांगण्यावरून विटाभट्टीच्या मागील भागातून चोरीचा मुद्देमाल आणि वाहने ताब्यात घेण्यात आली. यामध्ये चांदीची चैन, पायपट्टी, चांदीचे मुलाचे कडे, रोकड तसेच सिगारेटचे बॉक्स आदी साहित्याचा समावेश आहे. या कारवाईत एकूण ₹३ लाख ४७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

‘गधा’वर तब्बल २० गुन्हे!

पोलिसांच्या माहितीनुसार, पियुष उर्फ गधा निमजे हा घरफोडी आणि वाहनचोरी करणारा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वीच तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आरोपीवर पोलिसांची नजर होती. अखेर गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे यशोधरानगर परिसरातील घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला मोठी चालना मिळाली आहे. आरोपीच्या पुढील चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यनंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ नन्नावरे, तसेच पोलीस हवालदार गणेश गुप्ता, रवी अहिर, अमोल भेंडकर, लक्ष्मण पडवळ, रितेश दुधे, अक्षय कुलसंगे, मंगेश गिरी आदींच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More