‘डीजे’विरोधात नागपुरात आधी संदीप जोशी, आता प्यारे खान आक्रमक!

– महाराष्ट्रातील रस्त्यांवर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात डीजे नको
– ताजुद्दीन बाबा दर्ग्यात येणाऱ्या भाविकांनाही डीजे न आणण्याचे आवाहन

The Exposer
नागपूर : धार्मिक उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या डीजेच्या दणदणाटाविरोधात नागपुरात आता आवाज अधिक बुलंद होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा ताजुद्दीन बाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही डीजेच्या वापराला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ‘डीजे बंद करा’ या मागणीला नागपुरात आता सर्वधर्मीय स्वरूप येताना दिसत आहे.

ताजुद्दीन बाबा दर्ग्यात येणाऱ्या भाविकांनी सोबत डीजे आणू नये, असे कळकळीचे आवाहन प्यार खान यांनी केले आहे. एवढेच नव्हे, तर जुलूस आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा वापर टाळावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

‘कायदा सर्वांसाठी समान’; प्यारे खान यांचा थेट सवाल

“जेव्हा कोणताही कायदा बनतो, तेव्हा तो सर्व धर्मांच्या नागरिकांना समानपणे लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर डीजे लावला जाऊ नये,” असे स्पष्ट मत प्यारे खान यांनी व्यक्त केले. ध्वनिप्रदूषणाबाबत अनेक मौलानांनी तक्रारी केल्याचे सांगत त्यांनी धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली मोठ्या आवाजाचा दणदणाट करण्याची प्रवृत्ती थांबविण्याचे आवाहन केले. इस्लाममध्येही डीजेला प्रोत्साहन दिले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जुलूस असो वा गणेशोत्सव; नियम एकच हवा!

प्यारे खान यांच्या भूमिकेमुळे डीजेविरोधातील चर्चेला नवे वळण मिळाले आहे. धार्मिक मिरवणूक कोणत्याही समाजाची असो, ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, असा संदेश त्यांच्या आवाहनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील मौलाना आणि मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेत डीजेविरोधात समाजात जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

संदीप जोशीनंतर प्यारे खान; नागपुरातून ‘डीजेमुक्त’ संदेश!

गणेशोत्सवापूर्वीच माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेच्या वाढत्या दणदणाटावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता प्यारे खान यांनीही डीजेविरोधात ठाम भूमिका घेतल्याने नागपुरातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश पुढे येत आहे. धर्माच्या नावाखाली कानठळ्या बसवणारा आवाज नको; श्रद्धा हवी, पण ध्वनिप्रदूषण नको! सण साजरे करा, उत्साह साजरा करा; पण रस्त्यावरचा दणदणाट आणि ध्वनिप्रदूषण थांबवा—‘डीजे नको’ हा संदेश आता सर्वधर्मीय करण्याची वेळ प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More