नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबाराची ‘सुपारी’!

– गुजरात-छत्तीसगडमध्ये पोलिसांचा धडाका; सात आरोपी जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्याप फरार
– ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासले; एआय तंत्रज्ञानाची मदत, मोबाइल चॅटमधून ‘सुपारी कनेक्शन’चा उलगडा

The Exposer
नागपूर : नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गुजरात आणि छत्तीसगडमध्ये धडक कारवाई करत पोलिसांनी सात आरोपींना जेरबंद केले. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, त्याची मैत्रीण आणि अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे गोळीबारामागील नेमका सूत्रधार कोण आणि ‘सुपारी’चे जाळे किती खोलवर आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

&nपोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी उपस्थित होते.

२६ ऑगस्टच्या मध्यरात्री गोळीबाराने खळबळ

२६ ऑगस्टच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी गॅलरीच्या रेलिंगच्या काचेला लागल्याने त्याला छिद्र पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गोळीबारामुळे नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी विविध पथकांमार्फत तपास सुरू केला.

५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळले

आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींची ओळख पटविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. याशिवाय गुन्हे शाखेने ३० ते ४० वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांमधील सुमारे २०० सराईत गुन्हेगारांची चौकशी केली. आरोपींच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे लागले.

गुजरात-छत्तीसगडमध्ये धडक कारवाई; सात जण जेरबंद

गोळीबारानंतर आरोपी गुजरात आणि छत्तीसगडमध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके दोन्ही राज्यांत रवाना करण्यात आली.

पोलिसांनी गुरुवारी रात्री अंकुश धनक तोमरकर, अमित मधुकर ठाकरे, रिषभ ऊर्फ छोटा विशाल नागदेवे, रोहित ऊर्फ पुतल्या मुनेश्वर वाहने, कोंचा ऊर्फ ऋषभ भगवती पैथल, केतन दुर्गाप्रसाद मोटे आणि कार्तिक बबलू तोमरकर या सात आरोपींना गुजरात आणि छत्तीसगडमधून जेरबंद केले. सर्व आरोपींना नागपुरात आणण्यात आले असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बाबाजीच्या ऑफिसमध्ये कट शिजल्याचा संशय

गोळीबाराचा कट नेमका कुठे आणि कधी आखण्यात आला, याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, तपासातील सूत्रांच्या माहितीनुसार, बाबाजीच्या ऑफिसमध्ये फायरिंगचा कट आखल्याचा संशय आहे. घटनेपूर्वी तेथे आरोपी एकत्र जमल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. विनानंबरप्लेटच्या दुचाकीवरून छोटा ऊर्फ ऋषभ नागदेवे आल्याचे, तर अंकुशने गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘एमडी’ तस्करीची माहिती दिल्याचा संशय

या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार म्हणून ‘फल्ली’ याच्यावर पोलिसांचा संशय आहे. त्याच्याविरुद्ध ४६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुभम मोटघरे हे फल्ली आणि त्याच्या साथीदारांच्या एमडी तस्करीबाबत पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणातून मोटघरे यांना धाक दाखवून भीती निर्माण करण्यासाठी त्यांच्या घरावर गोळीबाराची ‘सुपारी’ देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

मोबाइल चॅटमधून ‘सुपारी’चा धागा

या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आरोपींच्या मोबाइलमधील चॅटमधून पोलिसांच्या हाती लागल्याचे समोर आले आहे. मुख्य सूत्रधार फरार असला तरी त्याने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून आरोपींना फायरिंगची सुपारी दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सूत्रधाराने आरोपींच्या टोळीला घटनेपूर्वी ५० हजार रुपये अमित ठाकरे याच्या माध्यमातून दिल्याचा संशय आहे. उर्वरित रक्कम गुन्हा केल्यानंतर देण्याचे ठरले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती नाही

सात आरोपी जेरबंद झाले असले तरी मुख्य सूत्रधार, त्याची मैत्रीण आणि अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. तपास सुरू असल्याने मुख्य सूत्रधारासह फरार आरोपींची नावे जाहीर करण्यास पोलिस आयुक्तांनी नकार दिला.

मकोकाची कारवाई होणार

या प्रकरणात संघटित पद्धतीने गुन्हा घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्पष्ट केले.

गुन्हे शाखेच्या पथकाला २५ हजारांचे रिवॉर्ड

गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेचे एपीआय वैभव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत पोलिस आयुक्तांनी पथकाला २५ हजार रुपयांचे रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

सात आरोपींच्या अटकेनंतर गोळीबाराचे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, आता फरार मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुख्य आरोपी फरार असल्याने गोळीबार कोणत्या करणावरून व कुणी घडवून आणला, याबाबतचे गूढ कायम आहे. मात्र, उलट सुलट चर्चा बघता गोळीबार कांडाचे अवेद्य दारू विक्रीशी संबंध आहे का, हे सुद्धा पोलिस तपासून पहात असल्याची चर्चा आहे. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More