वडिलांचा कथित अत्याचार अन् मुलीचा संतापाचा स्फोट! लाकडी बॅटच्या प्रहारात ४५ वर्षीय वडिलांचा मृत्यू

– दारूच्या नशेत मुलीला शिवीगाळ अन् जवळीक साधण्याचा प्रयत्न; प्रतिकारात केला हल्ला, एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना

The Exposer
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील-मुलीच्या नात्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत वडिलांनी मुलीला शिवीगाळ करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी झालेल्या वादातून संतप्त झालेल्या १७ वर्षीय मुलीने घरातील लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या हल्ल्यात ४५ वर्षीय जयपाल बारेलाल खोलपिटणे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.५० ते ९ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. घटनेची माहिती पोलिसांना ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०६ वाजता मिळाली.

मृत जयपाल खोलपिटणे हे दारूच्या आहारी गेले होते आणि ते मुलीला नेहमी शिवीगाळ करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच ते मुलीवर वाईट नजर ठेवत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेच्या दिवशी जयपाल हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी मुलीला शिवीगाळ करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता दोघांमध्ये वाद झाला. यावेळी वडिलांनी मुलीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संतापलेल्या मुलीने प्रतिकारात घरात ठेवलेल्या लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर प्रहार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या हल्ल्यात जयपाल खोलपिटणे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, १७ वर्षीय आरोपी मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील गुन्हा दाखल करण्याची व कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अल्पवयीन असल्याने तिच्याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया संबंधित बाल न्यायव्यवस्थेच्या नियमानुसार होणार आहे. या घटनेमागील नेमका घटनाक्रम, हल्ल्याची परिस्थिती आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More